
– मानवी हक्क सुरक्षा परिषदेची निवेदनाद्वारे मागणी…
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी : मागील २० दिवसात लालपुलिया परिसरात ६ लोकांचा अपघाती मृत्यू झाला असून सतत अपघाताची मालिका सुरूच आहे. परिणामी अपघात रोखण्यासाठी आता पोलिस चौकीची गरज निर्माण झाल्याने या ठिकाणी पोलिस चौकी द्यावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वणी शहरा जवळ असलेल्या वणी- यवतमाळ मार्गावरील लालपुलीया परिसरात अनेक कोल डेपो आहे. परिणामी या परिसरात नेहमी मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक होत असते.
त्यामूळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे, तसेच रस्त्यावर दुतर्फा उभे असलेल्या ट्रक वाहनांमुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरीकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
नुकताच १२ मे रोजी सकाळी ९ वाजता दोन युवकांचा याच परिसरात अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत लालपुलिया परिसरात पोलिस चौकी देण्यात यावी. पोलिस चौकी असल्यास या परिसरात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, विकेश पानघाटे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, यांचेसह भाऊसाहेब आसुटकर वणी विधानसभा अध्यक्ष, अजय चन्ने वणी शहर अध्यक्ष, सौ. सुनिता काळे वणी तालुका महिला अध्यक्ष, सौ. प्रमिला चौधरी, वणी शहर महिला अध्यक्ष, रवी खिरटकर, विश्वास काळे उपस्थित होते.