
– एक विद्यार्थी ठार – तीन विद्यार्थी जखमी
– मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील मार्डी येथून मारेगाव येथे विद्यार्थी वाहून नेणारा ऑटो पिसगाव जवळ पलटी झाल्याने ऑटोतील एक विद्यार्थी अपघात स्थळीच ठार तर इतर तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० वाजे दरम्यान घडली.
अनिकेत श्रावण पिंपळशेंडे (१६) रा .केगाव असे ऑटो पलटी होऊन अपघात स्थळीच ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अनिकेत हा मारेगाव स्थित राष्ट्रीय विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होता.
दरम्यान २७ ऑक्टोबर रोजी सकाळी मार्डी येथून दहा ते बारा विद्यार्थी घेऊन ऑटो मारेगावकडे येत होता. सदर ऑटो पिसगाव नजीक पोहोचला असता पांढरकवडा (लहान) कडून एक दुसरा ऑटो भरधाव येत होता. यावेळी विद्यार्थी वाहून नेणाऱ्या ऑटो चालकांने दोन ऑटोंची धडक टाळण्याकरिता ऑटोचे ब्रेक मारले.यावेळी अनिकेत बसून असलेल्या बाजूने ऑटो पलटल्याने अनिकेत हा ऑटो खाली दाबून काही फूट पुढे घासत गेला.
यात अनिकेतच्या डोक्याला जबर मार लागून तो घटनास्थळीच ठार झाला.तर ऑटोतील इतर तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती प्राप्त होताच पिसगाव येथील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तूर्तास इतर तीनही विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती आहे.
बस फेरी सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा काँग्रेस कमिटीचा इशारा
अविरत वाहतूक सुरू असणाऱ्या मारेगाव-मार्डी रस्त्यावरून बस फेऱ्या वाढविण्याची नितांत गरज असताना परिवहन मंडळ मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.नाहक बळी ठरलेल्या अनिकेतच्या जाण्याने आज याची प्रचिती आली.परिणामी मारेगाव-मार्डी रस्त्यावरून बस फेरी सुरू न केल्यास मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मारुती गौरकार यांनी लोकशस्त्रशी बोलताना दिला.