
– तालुक्यात वाळु धोरणाची फक्त चर्चा
– हायटेक वाळू धोरणाची अंमलबजावणी शुन्य
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
संपादकीय : प्रफुल्ल मोरेश्वर ठाकरे
बांधकाम क्षेत्राचा प्राण असलेली वाळू महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मे पासून केवळ ६०० रुपये ब्रास या दराने मिळणार असल्याची घोषणा शासनस्तरावरुन मोठा गाजावाजा करून केली गेली. परंतु मे महिन्याचा उत्तरार्ध येऊन ठेपला तरी तालुक्यात या वाळू धोरणाची पाहिजे तशी अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले नसल्याने सहाशे रुपये ब्रास रेतीचे वचन थिटे पडले की काय….? अशी चर्चा जनमानसात उमटत आहे.
पुर्वी अगदी सहज व माफक दरात मिळणारी वाळू व गौण खनिज विद्यमान स्थितीत तेवढ्या सुलभतेने मिळत नाही, हे वास्तव आहे.हा बदल शासन आणि प्रशासनाच्या गेल्या १५ ते २० वर्षांच्या काळातल्या कठोर नियमांमुळे व त्यातून उदयास आलेल्या माफियागिरीतून झाला आहे. मात्र,आता स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन वाळू धोरण तयार करण्यात आले आहे.नुकतीच महाराष्ट्र दिणी त्याची घोषणा करण्यात आली.
नवीन वाळू धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (१३३ प्रति मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनीज प्रतिष्ठाण निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इ. खर्च देखील आकारण्यात येतील.
वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबवण्यात येईल.यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल.ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची विक्री करण्यात येईल.असा या ‘हायटेक’ वाळू धोरणाचा वृत्तांत.
गोर-गरिबांना आपल्या स्वप्नवत घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासन स्तरावरून घरकुल योजना राबविण्यात येत आहे.परंतु बांधकाम साहित्याचे वाढते दर,रेतीची कमतरता आणि त्यात असले ‘हायस्पीड पण प्रक्रिया शून्य’ धोरण राबवून शासन गोरगरिबांची थट्टा मस्करी तर करीत नाही ना…? अशी कळ जनसामान्यातून उमटत आहे.
शासनाने निव्वळ घोषणांचा पाऊस पाडून जनसामान्यांना भुरळ घातली असली तरी प्रशासनाने त्यावर कुठलीही अंमलबजावणी तालुक्यात अद्याप तरी केल्याचे दिसून येत नाही. परिस्थिती जैसे थे आहे. आधी सात हजार रुपये प्रति ब्रास मिळणारी रेती आजही त्याच किमतीत मिळत आहे. यात जनसामान्य पुरते भरडले जात असून तुर्तास घोषणांच्या पावसात ६०० रुपये ब्रास रेतिचे वचन ‘थिटे’ पडत असल्याचे वास्तव तालुक्यात दिसून येत आहे.