
– कंत्राटी तत्वावर ३५ शिक्षकांच्या नियुक्तीचा आदेश निर्गमित
– ५ हजार रु.प्रतिमाह : ६ महीने नियुक्ती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे : मारेगाव
तालुक्यातील ‘झेडपी’ शाळांत आता ‘अतिथी’ शिक्षक भरती होणार आहे.सीईओ डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी नुकताच याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. यात मारेगाव तालुक्यात कंत्राटी तत्वावर ३५ स्वयंसेवकांची (शिक्षकांची) नियुक्ती केली जाणार असुन ५ हजार रु. प्रतिमाह मानधन असणार आहे.विशेष म्हणजे नियुक्त केलेले शिक्षक स्वयंसेवक हे ६ महिने वैध असणार आहे.
शिक्षकांअभावी तालुक्यातील जि.प. शाळांत शिक्षणाचा पुरता खेळ-खंडोबा झाला आहे. मागील सत्रात याची प्रचंड झळ विद्यार्थ्यांना बसली होती.परिणामी नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन अवघे दिवस लोटते न लोटते तोच शिक्षकांच्या मागणीसाठी तालुक्यातील वरुड येथील चिमुकल्यांनी पं.स.कार्यालयावर धडक दिली होती.अखिल भारतीय सरपंच परिषदेनेही वेळोवेळी शिक्षकांच्या मागणीस पुढाकार घेत कंत्राटी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणेसाठी जोरकस प्रयत्न केला होता.
परिणामी नवीन शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,यवतमाळ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे कडून मारेगाव तालुक्यात ३५ कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
या आदेशानुसार शिक्षक स्वयंसेवकाची नेमणूक गटशिक्षणाधिकारी यांचे सहनियंत्रणाखाली शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात येणार आहे.यासाठी स्थानिक अभियोग्यता धारकाची (D.ed/Dted) निवड केली जाणार आहे. स्थानिक ठिकाणी अभियोग्यताधारक उपलब्ध नसल्यास पदविका उत्तीर्ण (Ba,Bcom,Bsc) उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षक स्वयंसेवकांचा कार्यकाळ चालू शैक्षणिक सत्रापुरता म्हणजे सहा महिने वैध राहणार असून (१७९ दिवस) त्यानंतर ‘त्या’ उमेदवारांचा त्या जागेवरती विहित अधिकार राहणार नसल्याचे सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे कायमस्वरूपी शिक्षक भरतीसाठी हजारो अभियोग्यताधारक उमेदवार आंदोलनाची भाषा बोलत असताना जिल्हा परिषदेने मात्र कंत्राटी शिक्षक भरतीची तयारी केली आहे.परिणामी अभियोग्यता धारकांकडून यास काही प्रत्युत्तर मिळते काय…? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.