
– ७६ वर्षीय वृध्देचे तहसील कार्यालयासमोर ‘आमरण उपोषण’
– उपोषणाच्या पाचव्या दिवशीही तीढा कायम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गट क्रमांक ८२ मधिल फेरफार क्रमांक ४४१ रद्द करून फेरफार क्रमांक ४०१ कायम करुन सात बारा मध्ये दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी ७६ वर्षीय अनुसयाबाई ता.१३ सप्टेंबर रोजी पासून तहसील कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणाचे’ हत्यार उपसत प्रशासनाचे लक्ष वेधले. तुर्तास पाच दिवस उलटूनही उपोषणाचा तिढा मात्र कायमच आहे.
अनुसयाबाई जहांगीर फुलझेले (७६) रा.डोरली असे आमरण उपोषणास बसलेल्या वृद्ध शेतकरी महिलेचे नाव आहे.निळकंठ संभा भालशंकर यांची वारस असलेल्या अनुसयाबाई जहांगीर फुलझेले यांनी शेतजमीन मिळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार मारेगाव मंडळ अधिकारी व तलाठी मौजा, डोरली यांचेशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला. दशरथ चंद्रभान भालशंकर यांचे नावे फेरफार क्रमांक ४४१ व सातबारा मध्ये समाविष्ट करून वृद्धेवर अन्याय झाल्याची बाब अनुसयाबाईंनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे.
दिवाणी न्यायाधीश मारेगाव यांच्या न्यायालयात कायमस्वरूपी हक्क मिळवण्याकरिता दिवाणी दावा क्रमांक ४२/ २००८ दाखल केला असता न्यायालयाने आदेश पारित करून फक्त सौ. लुकी व सौ.अनुसया जहांगीर फुलझेले यांना वारस अधिकाराने कायम केले होते. परिणामी शेत गट क्रमांक ८२ मध्ये स्वतःचे नाव सातबाऱ्यात समाविष्ट करण्याकरिता अनुसयाबाईंनी अर्ज केला होता.
उपविभागीय अधिकारी वणी, तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ, यांचे कडेही याबाबतचा अर्ज सादर केला होता. तसेच अप्पर आयुक्त अमरावती विभाग यांचेकडे ही पुन्हा निरीक्षण अर्ज दाखल केल्याची बाब सदर निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
अप्पर आयुक्त अमरावती यांनी दशरथ चंद्रभान भालशंकर यांचे अपील फेटाळले असताना २७.७.२०२२ रोजी फेरफार क्रमांक ४४१ घेऊन दशरथ चंद्रभान भालशंकर यांचे कमी केलेले नाव पुन्हा कसे काय फेरफार व सातबारा मध्ये घेण्यात आले ?? असा सवालही वृध्देने प्रशासनास विचारला आहे.
दरम्यान पाच दिवस उलटूनही प्रशासनाकडून अनुसया बाईच्या आमरण उपोषणाची दखल न घेतली गेल्याने अनुसयाबाईस न्यायाची प्रतीक्षा लागली आहे.
डोर्ली येथील शेत गट नं. ८२ क्षेत्र ८.०२ हेक्टर आर या कुळाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन संपुर्ण शेत हे अर्जदार अनुसया जहांगीर फुलझेले याचे नावे लावण्याबाबत मागणी केली आहे. सदर प्रकरणी उप विभागीय अधिकारी वणी, यांचे न्यायालयात, सत्र न्यायाधीश क.स्तर मारेगाव, जिल्हा सत्र न्यायालय केळापूर, अति. जिल्हाधिकारी यवतमाळ, तसेच अप्पर आयुक्त अमरावती येथे सर्व संबंधितांनी वेळोवेळी अर्ज दाखल करुन न्यायाची मागणी केली. मा.अप्पर आयुक्त अमरावती यांचे ता.२२ मार्च २०२३ चे आदेशानुसार उपोषणकर्तीची आई लुखी हीचे पहील्या पतीपासुन जन्मास आलेली अनुसया तसेच दुसऱ्या पतीपासुन जन्मास आलेली अपत्ये यांचा सुध्दा वारस म्हणून विचार व्हावा यासाठी सदर प्रकरणी सुनावणी घेऊन सर्व संबंधितांचे म्हणने ऐकुन घेण्याबाबत निर्देशित केले आहे. तसेच फेरफार रद्द करण्याचे अधिकार तहसीलदार यांचे नसुन सक्षम अधिकारी यांचे कडे अपील करावी.
यु.एस.निलावाड
तहसीलदार मारेगाव.