
♦अनेक प्रशासकीय पदे प्रभारावरच
♦जलदगती सेवा मिळण्यास विलंब, विकास योजनांना बसते खिळ
♦लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील बहुतांश कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे अनेक दिवसापासुन प्रभारावरच असल्याने तथा रिक्त पदांमुळे नागरिकांच्या कामात दिरंगाई होत असुन अनेक विकास योजनांना खिळ बसत आहे.मात्र याकडे लोकप्रतिनिधींकडून सातत्याने सपशेल दुर्लक्ष होत असुन कायम स्वरुपी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
निसर्गाचे तालुक्याला वरदान असून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तालुक्याची ओळख आदिवासी बहूल तालुका म्हणून आहे.तालुक्यात १०८ गावांची दप्तरी नोंद असली तरी पाच गावे उजाड आहेत.उर्वरीत गावांचा विकास व्हावा,विकासापासून ग्रामिण भागात कुणीही वंचित नसावा यासाठी तालुक्यात ५७ ग्रामपंचायत असुन,यापैकी आदिवासी बहूल गावांची संख्या जास्त असल्याने निम्या ग्रामपंचायती पेसा योजने अंतर्गत येतात. झरी तालुक्याची निर्मीती होण्यापूर्वी या तालुक्यातील बहुतांश गावे मारेगाव तालुक्यात समाविष्ट होती.
शासकीय योजना सर्व सामान्यां पर्यंत पोहचाव्या यासाठी तालुका स्थळी सर्वच शासकीय कार्यालये आहेत.परंतू मागील काही वर्षा पासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे.बहुतांश कार्यालयातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून कार्यालयाचा प्रभार दुय्यम अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे.
यात कृषी विभागाच्या कार्यालयातील अनेक पदे रिक्त असुन,शिक्षण विभागात सुध्दा केंद्र प्रमुखांसह अनेक पदे रिक्त आहेत.या सोबतच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक,एकात्मिक बालविकास अधिकारी,भूमिअभिलेख अधिकारी,नायब तहसीलदार आदी विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची पदे प्रभारावर आहेत.त्यामुळे सर्व सामान्य जनतेची कामे वेळेत होत नसुन कार्यालयात सक्षम अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवरील “वचक”संपुष्टात आला असुन याला लोक प्रतिनिधींचे दुर्लक्षित धोरण म्हणावे काय…? असा तालुक्यातील जनता जनार्दनास प्रश्न पडला आहे.
“या संदर्भात तब्बल दिड दोन वर्षापुर्वी त्यावेळी कार्यरत असलेल्या विधान परिषद सदस्यांनी अतारांकीत प्रश्न शासनाकडे सादर करुन या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले होते. शासनाच्या विधानमंडळ मंत्रालयाकडून जिल्हा प्रशासनाला लेखी अहवाल सुध्दा मागितला होता.परंतु नियोजित कालावधी लोटल्यानंतर सुध्दा तालुक्यातील प्रभारी अधिकाऱ्यांचा प्रश्न अजुनही मार्गी लागला नाही.”