
♦ होळी पर्वावर शेतकऱ्यास “रंग लागे फिके”
♦ लोकशास्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
सर्वत्र धुलीवंदनाची तयारी सुरू असताना तालुक्यातील कोलगाव येथील शेतकऱ्याला मात्र १५ हजार रुपयाचा गंडा बसला आहे.तालुक्यातील कोलगाव येथील शेतात असलेल्या गोठ्यातून चोरट्यांनी चक्क बकरा चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सदर शेतकऱ्याचा “धुळीचा रंग फिका पडला” आहे.
कोलगाव येथील शेतकरी चेतन पारखी असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या शेतात असलेल्या गोठ्यात शेळ्या व कोंबड्या होत्या.यातील चक्क पंधरा हजार रुपये किमतीचा बकरा चोरट्यांनी रविवारी रात्रीस लांबविला.बकरा लांबविणाऱ्या चोरांची होळी आनंदात साजरी होणार असली तरी सदर शेतकऱ्याचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा होळीचा रंग मात्र फिका पडला आहे.बकरा चोरीस गेल्याची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.