
– जनसामान्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.परिणामी काँग्रेसने जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे.यात तालुका काँग्रेस कमिटीने आपली कंबर कसली असून उद्या ता.६ सप्टेंबरपासून मारेगाव तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरू केली जाणार आहे.जनसंवाद यात्रेत भाजप सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि अन्य मुद्द्यांवर रान उठवलं जाणार आहे. परिणामी जनसामान्यांनी या जनसंवाद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्यापासून (ता.६ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंवाद यात्रेचा श्री गणेशा ‘जनामाय कासामाय मंदिर वनोजादेवी’ येथून होणार आहे.मातेचा आशीर्वाद घेऊन काँग्रेसचे शिलेदार अवघा मारेगाव तालुका पालथा घालणार आहे.
६ ते ९ सप्टेंबर दरम्यान आयोजित जनसंवाद यात्रा ६ सप्टेंबर रोजी मार्डी सर्कल,७ सप्टेंबर रोजी कुंभा सर्कल,८ सप्टेंबर रोजी बोटोनी सर्कल तर ९ सप्टेंबर रोजी वेगाव सर्कलची भ्रमंती करणार आहे.
शेतकऱ्यांवरील अन्याय, महिलांवरील अत्याचार, युवा वरील बेरोजगारीचे सावट, कामाविना मजुरांचे रिकामे हात आदी अनेक मुद्द्यांवर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी जनतेशी संवाद साधणार असुन अनेक मूक मुद्द्यांना वाचा फोडणार आहे. परिणामी सर्वसामान्यांसाठी असलेल्या या जनसंवाद यात्रेत सर्व सामान्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.