
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव…..
सौर उर्जा पॅनल चे अनुदान जमा होणार असुन त्यासाठी जीएसटी रक्कम बँक खात्यात जमा करण्याची बतावणी करत तब्बल ४ लाख ८० हजार ६४५ रुपयांनी गंडविल्याची घटना तालुक्यात घडली होती. ही बाब लक्षात येताच संबंधितानी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर मारेगांव पोलीसांनी फसवणूक करणाऱ्या संशयीत व्यक्तीस ता. १४ जानेवारीला यवतमाळ येथून ताब्यात घेतले आहे.
जिवनदायीनी वर्धा नदी ही पावन नदी असुन या नदीच्या तीरावर साधू संताचा वास असल्याचे सांगण्यात येत असून ही पावन जीवनदायीनीच्या तीरावर चिंचमंडळ हे गाव वसले होते. मात्र नंतर सन १९७९ मध्ये नदीला येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेत, व जनसामान्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये यासाठी गावाचे दुसरीकडे पुनर्वसन करण्यात आले. मात्र याच नदी तीरावर चार एकर जागेत श्री समर्थ सदगुरू ब्राह्मचारी सुब्रमण्यम स्वामी यांचे संस्थान असून सदगुरु सुब्रमण्यम स्वामी यांचे वास्तव्य होते.
या संस्थानवर सध्या विश्वस्त मंडळ कार्यरत आहे. या संस्थानवर असलेल्या सौरऊर्जा पॅनेलची मुदत संपल्याने नवीन पॅनेल बसविण्या साठी दोन व्यक्ती संस्थानला येत असल्याची माहिती संस्थेचे माजी सचिव किशोर वैद्य यांनी कोषाध्यक्ष नरेश नामदेव जुमडे (रा. डोंगरगाव) यांना दिली. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दोन व्यक्ती मार्डी येथे येऊन जुमळे यांना भेटले. त्यातील एकाने आपले नाव कार्तिक गौरकार असल्याचे सांगितले. सदर संस्थानला एक लाख तीन हजार रुपयांचे सौरऊर्जा बसविण्यासाठी अनुदान जमा झाले असून, त्याच्या जीएसटीचे १८ हजार ५९० रुपये ऑनलाईन बँकेत जमा करा, तरंच अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल, असे सांगून पैसे टाकायला लावले. त्यानंतर वेळोवेळी अशीच कारणे सांगून १५ डिसेंबरपर्यंत पैशांची मागणी करत एकून ४ लाख ८० हजार ६४५ रुपये उकळले. मात्र, सौरऊर्जेचे कोणतेही अनुदान संस्थानच्या खात्यात जमा झाले नाही. याविषयी वारंवार विचारणा केल्यानंतर सुध्दा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. उडवाऊडवीची उत्तरे मिळाल्यानंतर फसवणूक झाल्याचे संस्थानचे कोषाध्यक्ष नरेश जुमडे यांच्या लक्षात आल्यानंतर नरेश जुमडे यांनी मारेगाव पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलीसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. व अखेर वर्षभरानंतर फसवणूक करणारा संशयीत पवन उर्फ कार्तिक गौरकार यास मारेगांव पोलीसांनी ता.१४ जानेवारीला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांचे मार्गदर्शनात पीएसआय विक्की जाधव अधिक तपास करीत आहे.