
– त्वचारोगात वाढ ; काळजी घेण्याची गरज
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
कापूस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस घरात पडुन असुन आज ना उद्या भाव वाढेल या अपेक्षेने घरात साठवलेला कापूस आता शेतकऱ्यांसाठी संकट बनला आहे. कारण, बाजारात विकावा तर भाव नाही अन् घरी ठेवावा तर अंगाला खाज येत आहे अशा दुहेरी संकटात शेतकरी गुरफटला आहे.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.जमीन खरडून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. उत्पादन कमी असूनही यावर्षी कापसाला चांगला भाव राहील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण कापसाचे भाव कायम गडगळतच राहिले. अद्यापही कापसाचे भाव कमी असून उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत आहे.
आज ना उद्या कापसाचे भाव वाढेल या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच साठवून ठेवला आहे. पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.ते संकट म्हणजेच कापूस घरात असल्याने अंगाला खाज सुटुन त्वचा रोगात वाढ होणे.
घरात अनेक दिवसांपासून कापूस भरुन असल्याने शेतकऱ्याची चिंता आणखी वाढली आहे. लहान बाळ ते मोठ्या लोकांना या कापसातील किडे चावत असुन कातडीचे रोग झाल्यासारखं सर्वांना हातापायांना खाज येण्याच्या घटनांत वाढ होताना दिसुन येत असुन शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.