
– ५ लाख रु.खंडणीची मागणी : पोलीसात तक्रार दाखल
– एक संशयित यवतमाळ येथून ताब्यात
– मारेगाव तालुक्यातील कोसारा रेती घाटावरील थरार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील कोसारा रेतीघाटावरून घरकुलधारकांस रेती उपलब्ध करून देणाऱ्या एका रेतीघाट धारकास चक्क बंदुकीच्या धारेवर धरत ५ लाख रुपये खंडणी मागितल्याची खळबजनक घटना १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान घडली.खंडणी न दिल्यास रेती घाट धारकास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.परिणामी रेती घाटधारकाने याबाबतची रितसर तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला दाखल केली असता मारेगाव पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत एका संशयीतास यवतमाळ येथून ताब्यात घेतले.
सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद (३४) रा.डेहनकर ले आऊट, भोसा,यवतमाळ यांनी २०२२-२३ या कालावधी करीता मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील वर्धा नदीच्या रेती घाटाचे टेंडर घेतले आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने आवश्यक रेती साठा करुन रितीसाठ्यातून घरकुलधारकांना रेती वाटपाचे काम सुरू आहे.
परंतू सैय्यद मन्सूर यांचा कोसारा रेती डेपोवर कामावर असणारा सुपरवायझर विकास झंजाळ यांना काही लोकांनी फोन करून “मन्सुरचा भाऊ कादर
फोन उचलत नाही ; त्याच्याकडुन रेती घाटाचा हफ्ता घ्यायचा आहे. जर त्याने ५ लाख रुपये दिले नाही तर कलेक्टरकडे व आपले सरकार पोर्टलवर तक्रार करणार…” असा संदेश सैय्यद मन्सूर यांचा भाऊ कादर यांना द्यावयास सांगितला.
सर्व नियमांचे पालन करून रेती वाटप सुरू असल्याने प्रथमतः सैय्यद मन्सूर यांनी याकडे विशेष लक्ष दिले नाही.दरम्यान १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजे दरम्यान सय्यद मन्सूर हे रेती घाटावरील काही कामगारांची चर्चा करीत होते.
यावेळी ललित अरुण गजभिये रा. विदर्भ सोसायटी, यवतमाळ हा आपल्या तीन साथीदारांसह तेथे आला.सय्यद मन्सूर यांना बंदुकीच्या धारेवर धरत ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. व २ लाख रुपये (हप्ता) महिना मला द्यावा लागेल असा धमकी वजा आदेशही दिला.
ललित याच्या तीन साथीदारांपैकी एकाने चक्क सय्यद मन्सूर यांच्या पोटाला चाकू लावला.यावेळी सय्यद मन्सूर यांच्या दिवानजी व सुपरवायझरने “तुम्हाला तुमचा हप्ता भेटून जाईल” असे म्हणून वेळ काढून नेली.
परिणामी सय्यद मन्सूर यांनी सहकुटुंब पोलीस स्टेशन गाठत याबाबतची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला दाखल केली असून भा.द.वी.कलम ३०७,३८४,३८६,३४ सहकलम ३, २५ आर्म कायद्यानुसार संशयितांवर गुन्हा
दाखल करण्यात आला व मारेगाव पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत एका संशयीतास यवतमाळ येथुन ताब्यात घेतले.
हि कारवाई मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनात पो.उ.नि.ज्ञानेश्वर सावंत, नापोका बारेकर, रजनिकांत पाटील, अजय वाभीटकर यांनी पार पाडली.