
– तालुक्यातील कोथुर्ला येथील भयान वास्तव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही तालुक्यातील कोथुर्ला येथील नागरिकांचा पाण्यातून प्रवास सुरू असून येथील नाला पावसाळ्यात त्यांची वाट अडवतोय.कोथुर्ला ते मांगली या दोन गावांना जोडणारा पूल न बनल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने न घेतल्यास जनहित कल्याण संघटना आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.
कोथुर्ला हे तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल गाव.शेती हा येथील प्रमुख व्यवसाय.गाव तसा काहीसा मागासच. पण स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही येथील नागरिकांच्या नशिबी पाण्यातून प्रवास लिहिलेला आहे.
कोथुर्ला ते मांगली या दोन गावांना जोडणारा पूल न बनल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुला अभावी येथील नाला पावसाळ्यात शेतकऱ्यांची वाट अडवून धरतो. तर एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन प्रयत्न करीत असताना येथील विद्यार्थ्यांना मात्र शाळेत जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यमान आमदारांना वारंवार अहवाल देऊनही त्यांचेकडून सदर बाबीवर कुठलेही ‘सुतोवाच’ आले नसल्याचे येथील नागरिकांचे सांगणे आहे.
दरम्यान सदर नाल्यावरील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर न झाल्यास जनहित कल्याण संघटना आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.