
–– रखडलेली नुकसान भरपाई तत्काळ द्या
— वन विभागाला जि.सरचिटणीस (काँग्रेस)संजय खाडे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वन्य प्राण्यांच्या वाढत्या उच्छादाने वणी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले असून वनविभागाकडून पंचनामे सुध्दा करण्यात आले. मात्र अजुनही साडे सातशे वर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंगळवार ता. १० सप्टेंबर रोजी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या उपस्थितीत, “रखडलेली नुकसान भरपाई तत्काळ द्या” अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा वनविभागाला देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे.
वणी उपविभाग आदिवासीबहुल असुन शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र मागील पाच सहा वर्षापासुन येथील शेतकरी निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकला असून दरवर्षीच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झेलावे लागत आहे. सोबतच पीक बहरत असताना वन्यप्राण्यांच्या तर हैदोसाने सुध्दा शेतकरी मेटाकुटीस आला असुन वणी तालुक्यातील सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षात माहिती नुसार, ९९६ शेतकऱ्यांच्या शेतात जंगली जनावरांनी अतोनात नुकसान केले. वनविभागाकडून या नुकसानीचा
पंचनामा सुद्धा करण्यात आला असुन आतापर्यंत फक्त २४० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. उर्वरित ७५६ नुकसानग्रस्त शेतकरी अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून वारंवार वनविभागाला मौखिक तथा लेखी तक्रार सुध्दा करण्यात आली मात्र आजपावेतो उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसुन फंड उपलब्ध नसल्याची कारणे सांगितली जात असल्याने, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, शेतकरी शेतमजूर, बेरोजगारांच्या हितासाठी अहोरात्र झटुन, न्याय मिळवून देणारे काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांची भेट घेत व्यथा सांगताच, खाडे यांनी शेतकर्यांना सोबत घेऊन वनविभाग कार्यालय गाठुन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रखडलेली नुकसान भरपाई तत्काळ द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा वनविभागाला देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर वऱ्हाटे, अशोक चिकटे, तेजराज बोढे, महेश वैद्य, अशोक पांडे, पी. एस. उपरे, पवन शा. एकरे, प्रेमनाथ मंगाम, प्रफुल्ल उपरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
अन्यथा तीव्र आंदोलन करणार..!
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत भरपाई देणे गरजेचे आहे. वनमंत्री हे आपल्या लोकसभा मतदार संघातीलच आहेत. मात्र त्यांच्याच मतदार संघातील शेतकरी लाभापासून वंचित आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना कार्यालयात अधिकारी हजर नसतो. शासन, प्रशासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. आगामी १५ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर वनविभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
संजय खाडे,
यवतमाळ जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस.