
– स्कूल बसचा टायर फुटला ; चिमुकले थोडक्यात बचावले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे : मारेगाव
काल वणी येथील सुंदर नगर मधील स्कूल बसचा अपघात चर्चेत असतानाच आज ता.६ जुलै रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलचे बसचा मागील टायर फुटला.केवळ चालकाच्या प्रसंगावधानाने निष्पाप चिमुकले थोडक्यात बचावले.परिणामी सतत होणाऱ्या अपघातांमुळे स्कूल बस सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गत काही वर्षाआधी वणी येथे स्कूल बसचा भीषण अपघात होऊन निष्पाप चिमुकल्यांचा नाहक बळी गेला होता.अख्या जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या ‘त्या’ अपघाताचे पडसाद जिल्हाभर उमटले होते.त्या अपघातात आपल्या मुलांना गमविणाऱ्या पालकांच्या मनात त्या भीषण अपघाताची सल कायम असतानाच काल वणी येथील सुंदर नगर मधील स्कूल बसचा अपघात झाल्याने स्कूल बस सुरक्षेचा मुद्दा पुनश्च एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान मारेगाव शहरातील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलची बस (क्र. एम.एच.४० वाय.७०८७) २५ ते ३० चिमुकल्यांसह शाळेकडे मार्गस्थ असताना येथील अमित फॅशन मॉल नजीक भरधाव बसचा मागील टायर फुटला.केवळ नशीब बलवत्तर म्हणून चालकाच्या प्रसंगावधानाने निष्पाप चिमुकले थोडक्यात बचावले.ही भयावह घटना ६ जुलै रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान घडली.
नियमांना केराची टोपली…!
खाजगी शाळांत ‘आम्ही श्रेष्ठ’ ची स्पर्धा असल्याने स्कूल वाहक बस बाबत असलेल्या नियमांना पुरती केराची टोपली दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.स्कूल बस सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाते की नाही…? याची नोंद शासन दरबारी आहे की नाही…? हे कायम गुलदस्त्यातच आहे.