
– इमारतीला असलेल्या साहित्याची होत आहे चोरी
– शासनाचे कमालीचे दुर्लक्ष
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी शहरात चार दशकापुर्वी पासुन निर्मिती केलेल्या इमारतीचा वापर मागील दोन दशकापासुन होत नसल्याने इमारतींची दुरावस्था झाली असून अतिशय जीर्णावस्थेत आहे.तर या इमारतीला असलेल्या वस्तु चोरीला जात असुन मध्यवस्तीत असलेल्या या इमारती अचानक कोसळून दुर्घटना होण्याची भिती वर्तविल्या जात आहे.
चार दशकापुर्वीच्या काळात शहराचे वैभव मानल्या जाणाऱ्या इमारती आज जीर्ण झाल्या आहेत. पंचायत समिती व महसूल कर्मचाऱ्यांचे निवास स्थान म्हणुन या वसाहतीची ओळख होती. कौलारु टुमदार घरे व निटनेटके कुटुंबीय यामुळे सामान्य नागरिकांचे हे आकर्षण होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वसाहतीच्या इमारती जीर्ण होत गेल्या. आणि दोन दशका पासून या इमारती धोकादायक बनल्याने कर्मचाऱ्यांनी वास्तव्य करणे सोडले.
अवघ्या काही दिवसातच इमारती मधील लोखंडी व लाकडी साहित्य चोरट्यानी लंपास करणे सुरु केले आहे. छतावरील साहित्य लंपास झाल्याने आज या इमारती डोक्यावर केशसंभार नसलेल्या मनुष्यासारख्या बनल्या आहेत.
बऱ्याच ठीकाणी भिंतीला तडे गेले असुन या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत. काही इमारतीचा वापर प्रसाधनासाठी केला जात असुन काही ठीकाणी अस्ताव्यस्त कचरा टाकण्यासाठी या इमारतीचा वापर केला जात आहे.
या इमारती अती जीर्ण झाल्याने व मध्यवर्ती भागात असल्याने दुर्घटनेपूर्वी या इमारती पाडून अतिक्रमीत असलेली जागा मोकळी करुन या जागेवर व्यापारी संकुल बांधून बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी होते आहे.