
– युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
लोकशास्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील एका गावातील एका कुमारीकेच्या घरी कुणी नसताना एका तरुणाने घरात प्रवेश करत कुमारीकेचा विनयभंग केल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान उघडकीस आली. दरम्यान युवतीने आरडाओरड केली असता युवकाने घटनास्थळावरून धूम ठोकली.याप्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित ही सतरा वर्षाची कुमारीका असून ती मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी युवक हा युवती च्या घराशेजारी राहतो.
दरम्यान एकोणवीस एप्रिल रोजी पिडितेचे आई-वडील देवकार्यासाठी बाहेरगावी गेले असता पिडिता घरी एकटीच होती.दुपारी दीड वाजेदरम्यान युवक पीडीतेच्या घरी येऊन पीडितेवर बळजबरी करू लागला असता पिडित युवतीने आरडाओरड केली.
पिडितेचा आवाज ऐकून घराशेजारीच राहत असलेली पिडितेची काकू आली असता “घडलेला प्रकार कुणाला सांगाल तर याद राखा” अशी धमकी आरोपी युवकाने पीडित युवतीला व तिच्या काकूला देत घटनास्थळावरून पोबारा केला.
घडलेला सर्व प्रकार पीडित युवतीने आपल्या आई-वडिलांना सांगितला असता कुटुंबीयांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपी युवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास मारेगाव पो.स्टे. ठाणेदार राजेश पुरी, पो.ना. अजय वाभिटकर करीत आहे.