
– तालुक्यातील कोसारा जिल्हा परिषद शाळेत रंगला सत्कार सोहळा
– जुन्या आठवणींना उजाळा : अनेकांची उपस्थिती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
बालपणीचे शालेय मित्र भेटले की वयाची साठी ओलांलडी तरी मनाला मोठी उभारी येते,त्या आठवणी,जपलेला भावस्पर्शी क्षण मनात कायम घर करून बसतो.याचीच प्रचिती १४ नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे रोजी तालुक्यातील कोसारा येथे आली.येथील जि.प.शाळेत शिक्षण घेऊन मोठ्या पदावर रुजू झालेल्या ९ माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक प्रदान केला.यावेळी असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ९ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील कोसारा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन ९ फुले ईतरत्र विखुरली गेली.मेहनत व आपल्या जिद्दीच्या बळावर या ९ ही फुलांनी नोकरी रुपात विविध क्षेत्रात मोठे हुद्दे काबीज केले.क्षेत्र वेगळे,शहरं वेगळी.परंतु आपल्या मातीशी जुळून असलेली नाळ या ९ ही मित्रांनी कायम मनात जपली होती.
दरम्यान १४ नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे रोजी प्रकाश पचारे, सचिन चांभारे, नामदेव कन्नाके, मोहन लांडगे, श्रवण कुत्तरमारे, प्रकाश राऊत,दिलीप येडगे, साईनाथ कन्नाके, अक्षय चांभारे, सागर खडसे हे ९ मित्र कोसारा येथे एकत्र आले.कित्येक वर्षानंतर एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.अखेर आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला त्या शाळेला संगणक भेट देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.परिणामी ही बाब वास्तवात उतरली.शाळेला संगणक प्रदान करण्यात आला.
यावेळी शाळा मुख्याध्यापक, सरपंच,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शाळेला संगणक प्रदान करणाऱ्या ९ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोसारा येथील सरपंचा छाया अंकुश खाडे, उपसरपंच सचिन पचारे, मुख्याध्यापिका कविता राऊत,शिक्षक वेनुशाम बाभळे, शिक्षिका काजल येडमे, शितल मांढरे,शाळा समिती अध्यक्ष प्रकाश खडसे यांचेसह शेकडो कोसारावासी उपस्थित होते.