
– वर्गखोल्या व शालेय पटांगणात सर्वत्र पाणी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गत काही दिवसापासून मारेगाव तालुक्यात पावसाने कमालीचा जोर पकडला आहे.ता.२१ सप्टेंबर रोजी दुपारी शहरासह परिसरात जोरदार पाऊस कोसळला.परिणामी धामणी येथील जिल्हा परिषद शाळा पूरती जलमय झाली असुन येथील वर्ग खोल्यांसह पटांगणात सर्वत्र पाणी साचल्याने यावेळी एकच गोंधळ उडाल्याची माहिती आहे.
मारेगाव शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर वसलेले धामणी हे गाव.तालुक्यात शिक्षकांच्या कमतरतेमुळे सर्वत्र सुरू असलेला शिक्षणाचा खेळखंडोबा धामणी येथेही दिसून येतो.येथे केवळ तीन शिक्षकांच्या आधाराने १ ते ७ वर्गातील ४४ विद्यार्थी शिक्षणाचे बाळकडू घेतात.
दरम्यान ता.२१ सप्टेंबर रोजी दुपारी मारेगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस कोसळला. यावेळी धामणी येथील जिल्हा परिषद शाळा पूरती जलमय होत येथील वर्गखोल्यांसह शाळेच्या पटांगणात सर्वत्र गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना बसण्यास जागाही उरली नसल्याची माहिती आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही शिक्षणाचे बाळकडू घेणाऱ्या,उद्याचे भविष्य असणाऱ्या चिमुकल्यांना बसण्यायोग्य शाळा उपलब्ध होत नसतील तर आपण खरंच स्वातंत्र आहोत काय…? हा प्रश्न या अनुषंगाने आज उपस्थित होतो आहे.