
♦”भीम गर्जना महिला बहुउद्देशिय संस्था” चंद्रपूर यांचा उपक्रम
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
आजची महिला पूर्णतः पूर्वीसारखी राहिली नसून ती प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व सशक्त झाली आहे. पुरुषांच्या बरोबरीने नवे आव्हान,नवे ध्येय व दृढ संकल्प घेवून ते पूर्ण करण्यास आजची स्त्री सक्षम होतांना दिसत आहे. स्वतःचा पाया मजबूत करत आपली एक नवीन ओळख निर्माण करीत आहे. पुरुषांनीसुद्धा स्वीकार करायला हवे की, सामाजिक कार्यातसुद्धा स्त्रीचे योगदान आज जास्त दिसून येत आहे.
सामाजिक कार्याला पुढे नेण्याकरिता चंद्रपूर येथील काही महिलांनी एकत्र येवून “भिम गर्जना बहुउद्देशिय संस्था” स्थापन करुन समाजासाठी आपले योगदान देण्याकरिता पुढे सरसावल्या आहे. याआधी या महिलांनी अथक परिश्रम घेवून जिल्ह्यातला पहिला महिला बँड पथक तयार करून त्यांच्यातील लपलेल्या कलेस पुढे आणून इतर महिलांसमोर आदर्श निर्माण केला.
जागतिक महिला दिनानिमित्त भिम गर्जना बहुउद्देशिय संस्था,चंद्रपूरच्या वतीने अनाथ मुलांचे बालसंगोपन करणारी संस्था “किलबिल” येथे जावून तेथील नवजात शिशू ते १०-१२ वर्षांच्या मुलांना बघून समस्त महिलांचे डोळे पाणावले.त्यांनी समस्त मुलांची आपुलकीने विचारपूस केली व तेथील मुलांसोबत वेळ घालवला आणि तेथील बालकांना आवश्यक वस्तूंची भेट दिली.
संस्थेच्या समस्त महिलांनी ज्या जोडप्यांना मूल होवू शकले नाही त्यांनी “किलबिल” येथील निरागस मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे.किलबिल येथे जावून भिम गर्जना बहुउद्देशिय संस्थेच्या महिलांनी एक वेगळाच आनंद अनुभवला.