
– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नाल्यात पडलेल्या जिवंत वीजतारांचा स्पर्श होऊन बैल जोडी ठार झाल्याची हृदयद्रावक घटना १४ मे रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान तालुक्यातील चिंचाळा येथे घडली.ऐन शेतीचा हंगाम तोंडावर असताना सदर घटनेने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकरी चारुदत्त नामदेव दातारकर व सालगडी रामदास रामकृष्ण खंडरे हे बैलबंडीने शेतात जात असता नाल्यात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने त्यांचे बैल जोडीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर दातारकर व सालगड्याने वेळीच बैलबंडी वरून उडी मारल्याने केवळ नशीब बलवत्तर म्हणून दोघे थोडक्यात बचावले.
शेतीचा हंगाम येऊन ठेपला असताना दोन्ही बैलांच्या अशा मृत्यूने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शेती कशी करावयाची…? हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.सदर घटनेचा पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी पिडित शेतकऱ्याची मागणी आहे.