
– एक संशयित ताब्यात : सोमवार पर्यंत पोलीस कोठडी
– मारेगाव पोलिसांकडून कसुन तपास सुरू
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगावात ता.१४ सप्टेंबर रोजी चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घालत एकाच रात्रीत तब्बल १७ घरफोड्या केल्याची घटना घडली होती.अखेर या खळबळजनक घटनेतील एक संशयित पोलिसांना गवसला असुन ता.११ ऑक्टोबर रोजी त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.संशयितास सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून संशयिताकडुन गुन्ह्याची उकल झाल्यास मारेगाव घरफोडी प्रकरणाचा तिढा सुटणार आहे.
अवघे शहर बैल पोळ्याचा आनंद साजरा करुन निद्रिस्त असताना ता .१४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री मारेगावात तब्बल १७ घरफोड्या झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.यात चोरट्यांनी ६ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याचा कयास होता.
परिणामी यवतमाळातुन फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.अखेर घरफोडी घटनेस महिना उलटत असताना फिंगरप्रिंट च्या आधारे मारेगाव पोलिसांना एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात यश आले आहे.
शेट्टी रमेश उर्फ प्रकाश राज मनीकम (५४) रा.प्रदुर,वलीपुरम जि.पलीवरम,तामिळनाडू असे मारेगाव घरफोडी प्रकरणातील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
तूर्तास पोलिसांकडून मारेगाव घरफोडी घटनेतील अन्य काही आरोपींची नावे हाती लागतील काय…या दृष्टीने संशयित आरोपीचा कसून तपास सुरू आहे.
परिणामी उशिरा का होईना मारेगाव घरफोडी घटनेतील एक संशयित पोलिसांच्या हाती लागल्याने घरफोडी घटनेचा तिढा मात्र काहीसा सुटण्याच्या मार्गावर दिसत आहे.
ही कारवाई मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचेसह पो.उ.नि.ज्ञानेश्वर सावंत, रजनिकांत पाटील,अजय वाभीटकर , ताजने मेजर, आनंद अलचेवार, प्रमोद जिड्डेवार यांनी पार पाडली.