
– तालुक्यातील मांगरूळ शिवारातील घटना
– ‘सर्प मित्र सोनु’ चे अजगरास ‘जीवनदान’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील मांगरूळ शिवारात ता .६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान चक्क साडे ७ फुटाचा अजगर आढळून आल्याने शेतकाम करणाऱ्या मजुरांची पुरती भंबेरी उडाली.परिणामी सर्पमित्र सोनु गेडाम यांना बोलवण्यात आले.यावेळी सोनू गेडाम यांनी साडे ७ फुटी अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून ‘जीवनदान’ दिले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने सापांच्या बिळात पाणी जाऊन साप बिळाबाहेर निघण्याच्या घटना वारंवार घडत असतात.परिणामी पावसाळ्यात साप दिसणे ही नित्याचीच बाब होऊन बसते.
दरम्यान ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान तालुक्यातील मांगरूळ शिवारात साप नव्हे तर चक्क साडे सात फुटाचा ‘अजस्त्र अजगर’ शेतमजूरांना दिसला.भल्या मोठ्या अजगराला पाहून शेतमजुरांनी पुरती घाबरगुंडी उडाली.परिणामी मारेगावचे सर्पमित्र सोनू गेडाम यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
सर्पमित्र सोनु गेडाम यांनी सवंगडी आनंद गव्हाने यांच्या मदतीने ‘अजगरास’ पकडुन सालेभट्टी येथील जंगलात सोडून जीवनदान दिले.यावेळी ‘साडे सात फुटी’ अजगर पाहण्यासाठी बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती.