
– एटीएम ची ‘कासवगती’ बनली डोकेदुखी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगांव
बँकेतील लाईन मध्ये मध्ये तासनतास ताटकळत उभे राहून पैसे काढण्यापेक्षा एटीएम वरून त्वरित पैसे काढून बाजारपेठेतील व्यवहार करता येतील इवल्याशा अपेक्षेने एटीएम वर आलेल्या नागरिकांना ‘सरकारी काम अन् दहा वर्ष थांब’ हा अनुभव आता नित्याचा झाला असुन संपूर्ण तालुक्याचा भार असलेले स्टेट बँकेचे एटीएम ‘कासव गतीने’ चालत असल्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी मारेगाव ही एकमेव मोठी बाजारपेठ आहे.ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची दिवसभर शहरात चांगलीच रेलचेल असते.काम कुठलेही असो पैशाची गरज ही भासनारच.सद्यस्थितीत शहरात स्टेट बँकेचे एकच एटीएम सुरू असल्याने संपूर्ण तालुक्याचा भार या एकाच एटीएम वर येऊन पडलाय. म्हणूनच की काय स्टेट बँकेचे एटीएम गेल्या काही दिवसापासून खूप ‘स्लो’ चालायला लागले आहे.
कधी एटीएम वरील एकच बटन दोन- तीनदा दाबावी लागते तर कधी एटीएम कार्ड एटीएम मशीन मध्ये टाकल्यानंतर प्रोसेस होताना ताटकळत वाट पहावी लागत असल्याने एखाद वेळी चूक होऊन ग्राहकाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“फाईव्ह जी” च्या युगात शहरातील एटीएमची स्पीड “टू जी “सारखी असल्याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून एटीएम मधून रक्कम काढताना अडचण येत आहे.एटीएमची ही बाब वारंवार बँकेच्या लक्षात आणून देऊन,प्रकाशित करूनही स्टेट बँक सदर बाब गांभीर्याने घेत नसून एटीएम आज ना उद्या सुरळीत सुरू होईल ही माफक अपेक्षा असलेल्या नागरिकांवर ‘सरकारी काम आणि दहा वर्ष थांब’ म्हणायची वेळ येऊन पडली आहे.