
– शहरासह तालुक्यात कुठेही एका हाकेवर हजर
– २०० च्या वर सापांना जीवनदान
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
साप म्हटलं की भल्याभल्यांना घाम सुटुन भंबेरी उडते.साप दिसताच आपल्या तोंडून पहिला शब्द निघतो ‘अरे बापरे’ आणि लगेच त्याला मारायचे कसे…? हा विचार मनात येतो. परंतु मारेगाव येथे वास्तव्यास असलेला सर्पमित्र सोनू गेडाम हा युवक अशा आपत्कालीन परिस्थितीत कुणाच्याही मदतीला एका हाकेने धावून जातो.सापाला पकडून जंगलात सोडणे हा जणू त्यांचा छंदच बनलाय.त्याने आजगत २०० च्या वर सापांना जीवदान दिले आहे.
सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते.परंतु सापांच्या जाती विषयीच्या माहिती अभावी साप दिसताच याच मित्राला जीवानीशी मारले जाते.
अमाप जंगलतोड तसेच वाढत्या शहरीकरणाने सापांचे आश्रयस्थान धोक्यात आल्याने साप मानवी वस्ती सह घरांमध्येही आढळु लागले आहे.भीतीपोटी लोकं सापाला मारण्याचा विचार करतात.सापांविषयी असलेली ही भीती दूर करण्याचे काम गेल्या तीन वर्षापासून सर्पमित्र सोनू गेडाम करीत आहे.
साप विशेषतः दोन प्रकारात मोडतात.विषारी आणि बिनविषारी.विषारी सापांमध्ये इंडियन कोब्रा, फुरसे,मन्यार आणि घोणस तर बिनविषारी सापांमध्ये तस्कर,धामण,कवड्या इ.परंतु सापाविषयी असलेले अज्ञान आणि भीती यामुळे साप दिसला की लगेच त्याला जीवनाशी मारले जाते.
सर्पमित्र सोनू गेडाम या युवकाने ही गोष्ट हेरून सापांना जीवनदान देणे सुरू केले.सापाला पकडून त्याला वनविभागाच्या स्वाधीन करणे अथवा सापाला जंगलात सोडून देणे असे करताना या युवकांने आजगत जवळपास दोनशेच्या वर सापांना जीवनदान दिले आहे.
मारेगांव येथे वास्तव्यास असलेला सोनू गेडाम हा युवक पाणटपरीचा व्यवसाय करतो.शहरात एका हाकेवर हजर होणारा युवक तालुक्यातून कुठूनही फोन आल्यास स्वखर्चाने तिथे जाऊन सापाला पकडतो.सापां विषयीची विविध पुस्तके वाचून तसेच सापाबद्दल माहिती मिळवून सोनुने आजपर्यंत अनेक लोकांची मदत केली. सर्पमित्र सोनू करत असलेले हे कार्य खरंच प्रशंसनीय आहे.
सापांविषयी असलेल्या अज्ञानामुळे व भितीमुळे सापांचा नाहक जीव जातो. सापांविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.परिसरात कुठेही साप आढळल्यास या नंबर वरती फोन करा.(७२१८३७७७५०)
सर्पमित्र,सोनू गेडाम,मारेगांव