
– केंद्र व राज्य सरकारचा निषेध
– निवेदना अंती मोर्चाची सांगता
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन आदिवासी बांधवांनी ता.९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक मार्डी चौकातून भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन करून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चात आदिवासी बांधवांनी मणिपूर घटने विरोधात तीव्र निदर्शने देत तेथील केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध केला.स्थानिक तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत सदर मोर्च्याची सांगता करण्यात आली.
भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन करून मार्डी चौकातून निघालेला धडक मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला.यात शेकडो आदिवासी बांधवांसह महिला व तरुणींनी सहभाग दर्शविला होता.
मणिपूर येथील कलंकित घटनेची पडसाद अवघ्या देशभर उमटत आहे.तेथील केंद्र व राज्य सरकार आरोपींवर कठोर शासन करण्यास असमर्थ असल्याने राष्ट्रपतींनी स्वतः यात लक्ष घालुन माणुसकीला काळीमा फासणाऱ्या मणिपूर घटनेतील नराधमांना फासावर चढवावे या प्रमुख मागणीसह चंद्रपूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फासावर चढवण्यात यावे, समान नागरी कायदा आदिवासींच्या रूढी परंपरा व हक्क मारक असल्याने तो लागू करण्यात येऊ नये आदी मागण्यांची घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चा तहसील कार्यालयावर धडकताच स्थानिक तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन या धडक मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळी मारेगाव तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.