
– विधवा मंजुळाबाईस जनसेवा फाउंडेशनचा आधार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गेल्या महिनाभरापासून तालुक्यात अवकाळीने कहर केला.यात वादळी वाऱ्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले.काहींचे गोठे तर काहींचे उभे घर पुरते जमीनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान होत अनेकांचे संसार उघड्यावर पडले.अशीच एक दुःखद घटना घडली ती तालुक्यातील कानडा येथे….!
मारेगाव तालुक्यातील कानडा हे मंजुळाबाईचे गाव.पती जग सोडून गेल्याने एकुलती एक मुलगी हीच तीचा जगण्याचा आसरा.मोलमजुरी करुन पोटाला चिमटा घेत अनेक दिवसांपासून पडक्या घरात कसाबसा आलेला दिवस पुढे ढकलत जगत असता एके दिवशी अनपेक्षित वादळी वाऱ्याने मंजुळाबाईचे डोक्यावरील छत पुर्णपणे जमीनदोस्त झाले.अन् आता जगायचे कसे….? या प्रश्नाचे काहुर त्यांचे डोक्यात माजले.
दरम्यान पडक्या घराच्या अस्ताव्यस्त पसाऱ्याकडे टक लावून पाहत बसलेल्या मंजुळाबाईस आधार मिळाला तो जनसेवा फाउंडेशनचा.जनसेवा फाउंडेशनचे संचालक सुरज अंकुश येवले यांनी विधवा मंजुळाबाईस घर बांधून देत त्यांचे कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या विधवा मंजुळाबाईचे घर पडल्याची बाब जनसेवा फाउंडेशनचे संचालक सुरज अंकुश येवले यांचेसह सचिव भुषनकुमार ढोबळे यांचे लक्षात येताच त्यांनी मंजुळाबाईस शक्य होईल ती मदत करण्याचा दृढनिश्चय केला.
अखेर जनसेवा फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्ते रूपेश ढोके,सुरज येवले,कानडा येथील सरपंचा सौ.सुषमा ढोके यांनी मंजुळाबाईचे घर उभारणीसाठी सर्वतोपरी मदत केली आणि पडक्या घराच्या जागी एक टुमदार घर उभे राहिले…अन् क्षणात ‘त्या’ मायलेकींच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलले.