
– गैरआदिवासी आशा सेविकेची निवड प्रकरण
– ता..५/६/२०२३ ची ग्रामसभा खोटी दाखवून, घेतला खोटा ठराव
– तालुका आ. वि परिषदेच्या संघर्षांला यश
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
ग्रामपंचायत गोंड बुरांडा येथे ता.५/६/२०२३ रोजीची घेण्यात आलेली ग्रामसभा खोटी असुन, खोटा ठराव घेवुन पेसा ग्रामपंचायत गोंडबुरांडा येथे गैरआदिवासी आशा सेविकेची निवड ही अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत गोंड बुरांडा येथील नागरिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. यात आदिवासीवर अन्याय होऊ नये यासाठी तालुका आदिवासी विकास परिषदेचे ता.अध्यक्ष, तथा पुरोगामी पत्रकार संघांचे सह सचिव सुमित गेडाम यांनी पाठींबा देत हे प्रकरण ताकदीने उचलुन धरले. आ.वि. परिषदेच्या संघर्षाला यश आले असुन गट विकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.
गोंड बुरांडा ही ग्रामपंचायत पेसा मध्ये असुन ता.५/६/२०२३ रोजी ग्रामसभा घेण्यात आली. परंतु ही ग्रामसभा फक्त कागदोपत्री दाखवून आशा सेविकेचा निवड ठराव सुध्दा कागदोपत्रीच असल्याचा ठपका उपोषणकर्त्यांनी ठेवत पंचायत समितीला लेखी निवेदन देऊन सुध्दा यावर कुठलीच ठोस कारवाई करण्यात आली नाही.पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे तिथे प्रथम प्राधान्य आदिवासी व्यक्तीला द्यायला पाहीजे असतांना गैर आदिवासीला का ?? असा सवाल करत, पेसा कायद्याला बगल देण्याचे काम येथील संबंधीत ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती, प्रशासन करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. पेसा कायदा हा आदिवासी लोकांचा स्वयंशासनाचा सर्वोच्च कायदा असून देखील पेसा कायद्याला बगल देण्याचे काम करण्यात आले.
दरम्यान या संदर्भात पंचायत समितीला वारंवार लेखी स्वरुपात देवून सुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले. विचारणा केल्यावर चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले परंतु यावर ठोस कारवाई होत नसल्याचे दिसताच गोंड बुरांडा येथील नागरिकांनी लोकशाही पध्दतीने उपोषणाचा मार्ग अवलंबला. आदिवासी विकास परिषदेने सुध्दा या प्रकरणात उडी घेतली.
अखेर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात दोषीवर कारवाई करण्यात येईल यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी गटविकास अधिकारी याच्या हस्ते उपोषण मागे घेतले.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे ता.अध्यक्ष सुमित गेडाम, शहर अध्यक्ष निलेश आत्राम, शिवसेनेचे (उबाठा) सुनिल गेडाम, उपोषणकर्ते अर्जुन आत्राम, सागर आत्राम, बाली आत्राम, कु.प्रविणा आत्राम, यांचेसह गोंड बुरांडा येथील असंख्य महीला पुरुष उपस्थित होते.