
– स्वातंत्र्य दिनाचे औचित्य : अवघे गाव एकवटले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील घोडदरा येथील तलाठी जयवंत कनाके यांच्या ‘कामाची पावती’ म्हणून १५ ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यदिनी’ जिल्हा परिषद शाळा,घोडदरा येथे आयोजित कार्यक्रमात शेकडो घोडदरा वासियांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अवघे गाव एकवटल्याचे चित्र दिसून आले.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचा आलेख पाहता एखाद्या कर्मचाऱ्यास त्यांच्या उत्कृष्ट कामाची पावती चक्क सत्कार करून देणे तसे दुरापास्तच.परंतु तालुक्यातील घोडदरा गाव याला अपवाद ठरले आहे.
येथील तलाठी जयवंत संबा कनाके यांच्या उत्कृष्ट कामाची पावती स्वतः गावकऱ्यांनी दिली असून १५ ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यदिनी’ घोडदरा स्थित जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अवघे गाव एकवटले होते.
तलाठी कनाके यांची बदली घोडदरा येथुन बोटोनी येथे झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे चित्र यावेळी दिसून आले. आपल्या कामात तत्पर राहून मनमिळावू स्वभावाने सर्वसामान्यांच्या मनात कायम घर करून राहता येते ही बाब या अनुषंगाने अधोरेखित झाली आहे.
यावेळी घोडदरा जि.प. शाळेतील शिक्षक, विस्तार अधिकारी माने, ग्रामसेवक, सरपंच तसेच गावातील शेकडो नागरिक यांचे सह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.