
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
जगद्गुरुश्री स्वामी श्री नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन सोहळा आज ता. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता संत जगन्नाथ महाराज मार्केट यार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव येथे होणार असुन या पादूका दर्शन व प्रवचनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असून त्यामध्ये मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर , आदिवासी पाड्यातील गरीब मुलांसाठी मोफत ड्रायव्हिंग स्कूल, गोरगरिबांच्या मुलासाठी नाणीज येथे इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, मोफत रुग्णालय, राज्यातील पाच महामार्गावर २४ तास विनादिनांक५३ रुग्णवाहिका अपघात ग्रस्त रुग्णांच्या सेवेत अविरतपणे सुरु आहे.
दरम्यान पादूका दर्शनाच्या अनुषंगाने जगद्गुरुश्रीच्या पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. जगद्गुरुश्रींच्या पादुकांचे सभा मंडपामध्ये आगमन झाल्यानंतर विविध कार्यक्रम होणार असून त्यामध्ये गुरुपूजन, उपासक दीक्षा, आरती सोहळा , जगद्गुरुश्रींचे पादुका आगमन, अमृततुल्य प्रवचन, दर्शन सोहळा, पुष्पवृष्टी तसेच मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत समाजातील गरजवंतांना ११ शिलाई मशीनचे मोफत वितरण करण्यात येईल.
यावेळी दीक्षादान कार्यक्रम होणार असल्याने जास्तीत जास्त भाविक भक्तगण यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून उपस्थित भक्तगणांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती आयोजन समितीचे पश्चिम विदर्भ पीठ शेगावचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे, पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे, जिल्हा निरीक्षक भानुदास जाधव, जिल्हाध्यक्ष कैलास डोंगरकर, मारेगाव तालुकाध्यक्ष सुभाष मते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश साबळे तथा पीठ प्रमुख, पीठ सहप्रमुख, पिठ व्यवस्थापक, जिल्हा निरीक्षक, पीठ समिती सदस्य, जिल्हाध्यक्ष, हिंदू संग्राम सेना, महीला सेना, युवा सेना, ज.न.म.प्रवचनकार, गुरुसेवक, सर्व आजी व माजी पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा समिती, तालुका समिती, सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.