
– लक्ष देण्याची गरज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील ग्रामीण भागात शेत-शिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते आहेत.मात्र योग्य देखभाली अभावी तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे.
शेतातील उत्पादित माल घरी आणणे व शेतात जाण्याकरीता शेतकऱ्यांना सोयीचे होईल या करिता पांदण रस्त्यांचा उपयोग केला जातो.मात्र सद्यस्थितीत तालुक्यातील पांदण रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असुन लक्ष देण्याची गरज आहे.
काही पांदण रस्ते पायवाट म्हणून वापरले जात असल्याने तसेच या रस्त्यांवरून ट्रॅक्टर,दुचाकीची ये-जा असल्याने बऱ्याच पांदन रस्त्यांवरती मोठमोठाले खड्डे पडले असून पावसाळ्यात चक्क शेतकऱ्यांना पाण्याच्या डबक्यातून वाट शोधत शेतात जावे लागते.
शिवाय पांदण रस्त्यांवरती शेतकुंपनाचे अतिक्रमण बऱ्याच ठिकाणी निदर्शनात येत असल्याने विरुद्ध दिशेने एकाच वेळी दोन वाहने आल्यास अडचण निर्माण होते.
संबंधित विभागाने सदर बाबीकडे लक्ष देऊन तालुक्यातील पांदन रस्त्यांचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.